मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे.
काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाउस होत आहेत. या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेक भागात पाणी साचले आहे. तर अनेक भागात घरांचे आणि इमारतींचेंही नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. यामुळे सकाळी नोकरी कामानिमित्त बाहेर पडलेले चाकरमानी अनेक रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडल्याच्या घटना घडल्या.