Mumbai Heavy Rainfall
पुढील काही तास मुंबईत अति मुसळधार, समुद्रात उंच लाटा; NDRF पथकं तैनातFile Photo

Mumbai Heavy Rainfall | पुढील काही तास मुंबईत अतिमुसळधार, समुद्रात उंच लाटा; NDRF पथकं तैनात

पुढारी ऑनलाईन डेस्क: सोमवारी (दि.८ जुलै) पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे. अनेक भागात वाहतुक ठप्प झाली आहे. रस्त्यावर पाणी साठल्याने सर्वसामान्य जनतेचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुढील २ ते ३ तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान समुद्रात देखील उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने किनापट्टीलगत एनडीआरएफची पथकं तैनात केली आहेत.

मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अपडेटनुसार, सोमवार पहाटे 2.30 ते 5.30 च्या दरम्यान औद्योगिक राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस पडला. IMD च्या नोंदीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत पहाटे 2.30 पर्यंत 40.9 मिमी पावसाची नोंद झाली. तर पहाटे 5.30 पर्यंत 210.9 मिमी पर्यंत पावसाचे प्रमाण वाढले. जे तीन तासांच्या कालावधीतील अधिक 170 मिमी होते. शहरातील अनेक भाग आणि रेल्वे स्थानकांवर पाणी साचले होते. दरम्यान IMD ने मुंबईत पुढील तीन तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वर्तवला आहे.

पहाटेपासून वीजपुरवठा खंडित, अनेक भागांना फटका

अंधेरी पूर्व आणि पश्चिम, चेंबूर, चुनाभट्टी, सायन, भांडुप, मुलुंड या काही भागांसह मुंबईच्या काही भागांमध्ये 1 ते 5 तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी पहाटेपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली.

मुंबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत

यापूर्वी बुधवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाण वाहतुकीला फटका बसला होता. त्यानंतर एका सूत्राने सांगितले की, सोमवारी खराब दृश्यमानतेमुळे पहाटे 2.22 ते पहाटे 3.40 पर्यंत धावपट्टीचे कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर विमानसेवा विस्कळीत झाली.

तात्काळ मदतीसाठी 'हा' टोलफ्री क्रमांक जारी

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीची संपूर्ण यंत्रणा मैदानात उतरली आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना विनंती आहे की, 'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत, तात्काळ मदतीसाठी 1916 वर कॉल करा' अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news