

मुंबई : रविवारपासून (दि.१४) पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पुन्हा तुंबवले आहे. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे व जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. तर सोमवारी (दि.१५) सकाळपासून पश्चिम व मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली आहे.
मुंबई शहर व उपनगरात गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून रविवारी सायंकाळीपासून पडलेल्या पावसामुळे चहुकडे पाणीच पाणी झाले. उपनगरपेक्षा पावसाचा शहर विभागात जास्त जोर होता. शहरात २४ तासात १३४ मिमी तर उपनगरात ७४ मिमी पाऊस झाला. बांद्रा १७६ तर वरळी १७० मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे सकाळी सहा वाजल्यानंतर विरार-चर्चगेट, कल्याण-सीएसएमटी व पनवेल सीएसएमटी हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडून गेले.
शहरात ठीक ठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १०० पेक्षा जास्त पंप सुरू करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन टीम सह अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यासाठी सतर्क झाले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गाचं एस. व्ही. रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, सीएसएमटी, दादर, चेंबूर, सायन, आदी भागात वाहतूक कोंडी झाली आहे.
शहरातील १० ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या तर ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या किरकोळ घटना घडल्या तर एक ठिकाणी घराचा काही भाग कोसळला मात्र यात कोणीही जखमी नाही. सोमवारी (दि.१५) सायंकाळी पाच वाजता समुद्राला मोठी भरती असल्यामुळे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रणाला सतर्क राहण्याच्या सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.