

पूर्णा : शहरासह तालुका परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारपासून पून्हा एकदा जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. आधी झालेल्या तिबार अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबिन, तूर मुग उडिद, कापूस, ज्वारी पीकं शेतकऱ्याच्या हातातून गेली आहेत. आता पुन्हा जोरदार अतिवृष्टी चालू झाल्यामुळे सगळीकडे शेतशिवारातून पाणीचपाणी वाहत आहे.
नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणा-या पावसामुळे औंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पूर्वीच्या काळी "झाला पोळा अन् पाऊस झाला भोळा"असी म्हण प्रचलित होती. आणि व्हायचेही तसेच बैलपोळा सण झाला की पाऊस उघडायचा. मात्र आता तसे राहता न अवेळी पाऊस कधीही पडत आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुग पिकांच्या शेंगाला झाडावरच मोडे फुटून ते वाया गेले.
सोयाबिन, कापूस, तूर उन्मळून झिरपला आहे. अतिवृष्टीत पिचून उंचवटा क्षेत्रात कसेबसे तग धरुन असलेल्या सोयाबिन पिकांना वाफसा नसल्यामुळे शेंगा न भरता त्या चपट्या झाल्या आहेत. पिकांच्या मुळात पाणी साचल्याने त्या नासून गळूनही जात आहेत. परिणामी, संपूर्णच खरीप हातातून जात असल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
अतिवृष्टीबाधित झालेल्या पिकांचे कृषी व महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. परंतु अनुदानाचा अद्याप निर्णय झालेला नाही. प्रशासकीय कर्मचारी नदी ओढ्या काठच्या बाधीत पिक पंचनाम्यासहच सरसकट अनुदानासाठी प्रयत्न करु लागले आहेत. शासनाने फक्त नदीनाल्या काठच्या बाधीत पिकाचेच पंचनामे करण्याचा सुचना दिल्या ख-या पण आता सर्वच क्षेत्रील खरीप पिकं अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाली आहेत. तेव्हा सरसकट अनुदान मिळणे आवश्यक आहे. मात्र सरकारने तसे आदेश अजून काढले नाहीत.त्याच बरोबर सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेत पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिड टर्म अवस्थेत तक्रारीही करता येईनात. तक्रारी केल्या तरी मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक आपत्तीत पीक बाधीत झाले तरी नुकसान भरपाई मिळणार नाही.
केवळ पिक कापणी उंबरठा उत्पादन अव्हरेज काढल्यावरच नुकसान भरपाई देण्याचे ठरवल्या जाईल.तेही मागील सात वर्षाचे उंबरठा उत्पादन पाहून भरपाई देण्याचा नवीन नियम घातल्या गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीत पिकं गेले तरी पिक विमा नुकसान भरपाई मिळणे कठीण दिसत आहे. मागच्या वर्षी नाममात्र एक रुपयात पिक विमा भरुन मिड टर्म मध्य पिक बाधीत झाल्यास तक्रारी नंतर क्लेम मंजूर होवून मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळाली.
यंदाच्या खरीप हंगामा पासून लागू केलेल्या सुधारित प्रधानमंत्री पिक योजनेअंतर्गत सोयाबीन हेक्टरी ११३० रुपये विमा हप्ता भरुनही मिड टर्म अथवा काढणीपश्चात तक्रार क्लेम करण्याचे ट्रिगर काढून टाकले गेले. मग पैसे भरुनही भरपाई मिळणार नसेल तर ही पिक विमा योजना कशासाठी आहे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. सुधारीत नियमातून निदान मागील सात वर्षाचे उंबरठा उत्पादन ग्राह्य धरणे ही बाब तरी वेगळी असती तर पिक कापणी काढणी उत्पादन अव्हरेज प्रमाणे शेतकऱ्यांना काहीतरी भरपाई मिळाली असती.एकंदरीत सर्वच बाबीतून शेतकरी हवालदील झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून सुरु झालेल्या जोरदार पाऊसाचे पुर्णा-चुडावा महसूल मंडळात ३ ते ४ वाजेपर्यंत ढगफुटी सदृष्य पध्दतीत रुपांतर झाले. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर येऊन पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतातील माणसे अडकून पडली आहेत. तर वाई लासीना येथे हळदी पिकात पाणी शिरले आहे.