

बोरी: बोरीसह परिसरात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज रविवारी (दि.१४) सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी शहरासह आसपासच्या भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गल्लीबोळांमधील रस्ते जलमय होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. बोरी येथील संभाजीनगर भागात संपूर्ण गल्ली पाण्याखाली जाऊन नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. उभे असलेले सोयाबीन, तूर, कापूस या पिकांवर पाण्याचा विळखा बसला असून काही ठिकाणी पिके वाहून गेल्याचेही वृत्त आहे. या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.