

मुंबई: लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. तिकडे वसई-विरारमध्येही मुसळधार पाऊस झाला असून, रस्ते जलमय झाले आहेत.
सोमवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबई व परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज मुंबईकर बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करतील.
वसई-विरारमध्ये वाहनेही पाण्याखाली
वसई-विरार शहरात रविवारी सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. वसई, नालासोपारा आणि विरारमधील बहुतेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली आहेत.