

मुंबई: मुंबईहुन गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, या रेल्वे गाड्यांच्या डब्यात असलेल्या अस्वच्छतेमुळे चाकरमानी प्रचंड हैराण झाले आहेत.
डब्यातील अस्वच्छतेचे व्हिडीओ करून प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. मात्र, अजूनही रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेबाबत ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने यावर्षी एकूण ३८६ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.
तसेच १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान सीएसएमटी- सावंतवाडी रोड या मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्या धावणार आहेत. जवळपास २.५० लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले आहे.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे कोकणकन्या एक्सप्रेस आणि तुतारी या दोन्ही रेल्वे गाड्याच्या सिल्पर क्लास आणि सर्वसाधारण डब्यातील शौचालय आणि वॉश बेसिनबाबत अनेकांच्या तक्रार आहे.
या दोन्ही गाड्यांमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी येत असते. प्रवासात शौचालयात पाणी सुद्धा नसते. सर्वाधिक महसूल या दोन गाड्यांमुळे रेल्वेला मिळतो.
२.५० लाखांहून अधिक प्रवाशांचे आरक्षण
त्याहीपेशा वाईट अवस्था ही दुपारी आणि रात्री सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आहे. या विशेष गाड्यांसाठी रेल्वेने जुने डब्बे जोडले आहेत.
त्यामुळे डब्यातील फाटलेल्या सीट तसेच प्रचंड दुर्गंधी आणि घाणीने भरलेले डब्यातील शौचालय आणि वॉश बेसिनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जवळपास २.५० लाखांहून अधिक प्रवाशांनी गणपतीसाठी रेल्वेचे आरक्षण केले आहे.
त्यापेक्षाही जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. अशावेळी डब्यातील स्वच्छतेच्या काही उणिवा कामगारांकडून राहू शकतात, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.