

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काहीच दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे मिसिंग लिंकच्या रखडलेल्या कामाची पुन्हा चर्चा सुरू झाली. प्रकल्पाचा अपप्रचार टाळण्यासाठी रीलस्टार्सची मदत घेण्यात येत आहे. मिसिंग लिंकची जाहिरात करणारे काही रील्स सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई वाहिनीवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. मिसिंग लिंक उभारण्याचे काम 2019 साली सुरू करण्यात आले होते. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर डिसेंबर 2025पर्यंत हे काम संपणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या प्रकल्पाची काही कामे शिल्लक आहेत. 1 मेपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक सुरू होणार असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप त्याबाबत खात्री नाही. प्रकल्पाला विलंब झाल्याने त्याचा खर्च 6 हजार 850 कोटींवरून 7 हजार 500 कोटींवर गेला आहे.
सध्या ज्या परिसरात मिसिंग लिंक उभारला जात आहे तो भाग द्रुतगती मार्गावरून पार करताना लोणावळा आणि खंडाळा घाट ओलांडावा लागतो. नागमोडी वळणांमुळे हे अंतर 19 किमी आहे. मिसिंग लिंकमुळे हा प्रवास 6 किमीने कमी होईल. तसेच जुन्या व नव्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होईल.