Mohan Bhagwat| संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’: मोहन भागवत
मुंबई : स्वयंसेवकांचे अखंड कष्ट आणि संघावरील समाजाचा स्नेह व विश्वास यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम वाढले आहे. त्यामुळे भाजप सत्तेत आल्याने संघाला ‘अच्छे दिन’ आले असे नाही; तर संघामुळे भाजपला अच्छे दिन आले. संघाची समाजातील शक्ती, स्वीकारार्हतेचा समविचारी आणि भारतीय नीतीवर चालणाऱ्या पक्षांना आपसूक लाभ होतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.
संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची 100 वर्षे : नवे क्षितिज’ या दोनदिवसीय संवाद कार्यक्रमात सरसंघचालकांनी मुंबईत मान्यवरांशी संवाद साधला. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहातील या कार्यक्रमात सरसंघचालकांनी रविवारी उपस्थितांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले. व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसीया, कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर, मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया उपस्थित होते.
भाजपची सत्ता, सरसंघचालकांची नियुक्ती आणि निवृत्ती तसेच सामाजिक आरक्षणाच्या प्रश्नांवर सरसंघचालकांनी स्पष्टपणे संघाची भूमिका विशद केली. भाजप सत्तेत आल्याने संघाला ‘चांगले दिवस’ आले का, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले, भाजप सत्तेत आहे म्हणून संघाला ‘चांगले दिवस’ आले, असे नसून प्रत्यक्षात उलट घडले आहे. संघाच्या समाजातील वाढलेल्या शक्तीचा, स्वीकारार्हतेचा समविचारी व भारतीय नीतींचे अनुसरण करणाऱ्या पक्षांना फायदा झाला, हे महत्त्वाचे आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेले अखंड कष्ट आणि संघावरील समाजाचा विश्वास यामुळेच संघाचे काम वाढले आहे.
संघ स्वयंसेवकांचे परिश्रम
आणीबाणी, राम मंदिर आंदोलनासह स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती अशा अनेक उपक्रमांतून संघ स्वयंसेवक परिश्रम घेत राहिले. संघ भारतीयत्वाच्या धोरण, विचारांवर काम करतो. समाजावर त्याचा प्रभाव पडतो, असेही सरसंघचालक म्हणाले.
संघाचे काम व्यक्ती निर्माणाचे
संघाशी संबंधित संस्था, संघटना अथवा पक्ष यांच्यावर संघाचा कोणताही दबाव नसतो. तिथे काम करणारे स्वायत्तपणे आपले निर्णय करतात. भाजपमध्ये असलेले स्वयंसेवक जी चांगली कामे करतात, त्याचे श्रेय आणि पाप-पुण्य त्यांचेच आहे. मात्र, त्यांच्या कामात काही कमतरता राहिल्यास ते आमच्यातून गेलेले असल्याने त्यांच्या काही पापांचा भार आमच्यावर येतो. पालक या नात्याने ती नैतिक जबाबदारी आम्ही घेतो. परंतु संघाचे काम हे केवळ आणि केवळ व्यक्तिनिर्माणाचेच काम आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालकांबाबतचा निर्णय हा संघाचाच
हिंदू हाच संघाचा सरसंघचालक असेल, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ब्राह्मण आहे किंवा एससी-एसएसटी असा निकष यासाठी नसल्याचे त्यांनी सांगितले. वयाच्या 75 नंतर नव्या पिढीकडे पदे सोपवून संघाचे नित्य कार्य करावे, अशी माझी धारणा असली तरी त्याबाबतचा निर्णयही संघच करतो, असेही भागवत म्हणाले.
संविधान संमत आरक्षण लागू राहिले पाहिजे
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, ज्यांच्यावर पिढ्यान्पिढ्या अन्याय अथवा अत्याचार झाला, त्यांचे सर्वांगीण उत्थान होईपर्यंत व त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईपर्यंत संविधानसंमत आरक्षण हे लागू राहिले पाहिजे, अशी संघाची निःसंदिग्ध भूमिका भागवत यांनी यावेळी बोलताना मांडली. तणावाच्या प्रसंगात समाज एकमेकाविरोधात येणार नाही, हे पाहावे लागेल. जातींच्या राजकारणाने लाभ मिळतो, असे वाटल्याने राजकीय शक्ती काही हातखंडे वापरतात. समाजाने त्याला प्रतिसाद दिला नाही तर राजकारणीही बदलतात. अमके जातीयवादी आहेत किंवा तमके समतावादी, अशी मांडणी साफ चुकीचे आहेन. राजकीय लोक हे केवळ ‘व्होटवादी’ असतात. त्यामुळे मतदाराने सुबुद्ध झाले पाहिजे. समाजात एकतेचे दर्शन घडेल तर सगळेच वेगळी भाषा बोलू लागतील, असेही भागवत म्हणाले.
अवैध घुसखोरीबाबत समाजाने सजग होण्याची गरज
जोरजबरदस्ती अथवा लालूच दाखवून धर्मांतर होत असेल तर ते निषेधार्हच आहे. त्याला प्रत्युत्तर हे घरवापसी असेल, असेही भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसंख्येचे गुणोत्तर हे केवळ जन्मदरातील घटीमुळे बदलत नसून ते धर्मांतर व अवैध घुसखोरी यामुळेही बदलत असल्याचेही ते म्हणाले. अवैध घुसखोरांबाबत समाजाने सजग होण्याची गरज आहे. यंत्रणेनेही घुसखोरांचा शोध घेऊन त्यांची उलट रवानगी करण्याचे धोरण कठोरपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. विदेशी अवैध घुसखोरांना रोजगार देण्याऐवजी तो आपल्या देशातील हिंदू अथवा मुस्लिमांना का देऊ नये, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
बांगला देशातील हिंदू संघटित झाल्यास अत्याचाराला आळा
बांगला देशातील सव्वा कोटी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन करत प्रथमच तेथील हिंदू एक होऊन आपल्यावरील अन्याय थोपविण्याच्या भूमिकेत आला आहे. बांगला देशी हिंदू एक झाल्यास अत्याचाराला आपोआपच पायबंद घातला जाईल. तसेच त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य जगभरातील हिंदूंकडून नक्कीच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समाजात भाषिक भेदभाव नाही
भाषिक भेदभाव, हिंसेच्या प्रश्नावर उत्तर देताना, समाजात भाषिक भेदभाव नसल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या म्हणून सगळेच मराठी लोक तलवार उपसून आहेत किंवा अन्य भाषिक भाले घेऊन उभे ठाकले आहेत, अशी स्थिती नाही. भाषिक हिंसेच्या घटना म्हणजे स्थानिक पातळीवरचे आजार आहे. ते स्थानिकच राहतील, सार्वत्रिक होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. राजकीय घटक असे वाद वाढवायचाही प्रयत्न करतात. आपण मात्र भारतीय एकतेच्या बाजूने ठामपणे उभे राहायला हवे. गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याची ताकद समाजात हवी. काहीजण काही गोष्टी करतात म्हणून संपूर्ण समाजावर त्याचा दोष लादता येणार नाही, असे मोहन भागवत म्हणाले. तर, संघ भारतीय भाषांचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा ही संघाच्या कार्याची भाषा होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील मान्यवर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, क्रीडापटू, सामाजिक संस्थांचे सदस्य, धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, सोशल मीडिया प्रभावक सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातून हर्षल गोएंका, सज्जन जिंदल, अजय पिरामल, कुमार मंगलम बिरला, एस सुद्रमणियम (एल अँड टी), शशीधर जगदीशन (एचडीएफसी बँक), रिदम देसाई (मोर्गन स्टॅनले) उपस्थित होते; तर चित्रपटसृष्टीतून अक्षय कुमार, विकी कौशल, अनन्या पांडे, संगीतकार प्रितम, पं. हृदयनाथ मंगेशकर, करण जोहर, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, सुबोध भावे, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ, विनीत कुमार सिंह, रवी दुबे, रुपाली गांगुली, अक्षय विधानी आदी उपस्थित होते.
सरसंघचालक म्हणाले,
2047 ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचेच तुकडे करू
एससी किंवा एसटीही सरसंघचालक होऊ शकतो
सरसंघचालक हा हिंदूच असेल
संविधान संमत आरक्षण लागू राहिले पाहिजे ही संघाची भूमिका
सहमतीने समान नागरी कायदा
समान नागरी कायद्यासाठी समाजाची मानसिकता बनवून व सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन अशाप्रकारचा कायदा लागू करावा, असे आमचे मत आहे. उत्तराखंड व अन्य काही राज्यांत तशाच प्रकारचे प्रयोग होत असल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो. भारत हा विविधतेतून एकता जपणारा देश आहे, हे सूत्र अशा प्रकारचे कायदे बनवताना प्राधान्याने लक्षात ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली.
सावरकरांमुळे ‘भारतरत्न’ उपाधीचाच सन्मान वाढेल
भारतरत्न हा सन्मान न मिळताही स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोट्यवधी भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. तथापि, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ सन्मान दिल्यास या सन्मानाची प्रतिष्ठा वाढेल, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
मोदींचे सरकार हे आग्रही आणि ठाम
आंतराष्ट्रीय करारमदार करताना आपल्या राष्ट्रीय हितांचे नुकसान होणार नाही, कमीतकमी तोटा होईल. दोन्ही बाजूंचा फायदा होईल याच सुत्रावर व्यापार करार होतात. अमेरिकेसोबतचा व्यापार करार मी अद्याप वाचलेले नाही. मात्र, केंद्रातील सध्याचे मोदी सरकार हे राष्ट्रीय हितांबाबत आग्रही राहणारे आणि त्यासाठी ठामपणे उभे राहणारे सरकार आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतच्या व्यापार करारातही सरकारने तीच भूमिका पार पाडली असेल याची मला खात्री आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

