

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' बोगद्यात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोर असलेल्या आयशर मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले.
मृत व्यक्तीची ओळख तुषार भूमकर (वय अंदाजे 30 ते 35 वर्षे) अशी आहे. फॉर्च्युनरमधील इतर चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, मालवाहू टेम्पोतील प्रवासीही किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघाताचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फुटेजमध्ये भरधाव फॉर्च्युनर कार टेम्पोला मागून धडक देताना दिसते. धडकेचा जोर इतका होता की टेम्पो अंशतः उलटला, तर कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातग्रस्त आयशर टेम्पोमध्ये भाजीपाल्याची वाहतूक सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळची (MSRDC) रुग्णवाहिका, बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतर काही काळ 'मिसिंग लिंक' बोगद्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, बचावकार्य पूर्ण करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या भीषण अपघातानंतर 'मिसिंग लिंक' बोगद्यातील अतिवेगाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नव्याने सुरू झालेल्या या मार्गावर वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे आणि बोगद्यात सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.