

मुंबई : मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर बेपत्ता व्यक्तीचे नाव, वय, छायाचित्र, उंची, कपड्यांचे वर्णन, बेपत्ता झाल्याची तारीख आणि संबंधित पोलिस ठाणे अशी माहिती उपलब्ध करून दिली जाते. या नोंदी वेळोवेळी अद्ययावत होत असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचा व त्यासाठी नागरिकांची मदत घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.
मुंबईत बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता संकेतस्थळावरील माहिती (अद्ययावत)अपडेट करण्यात आली. त्यामध्ये घाटकोपर पश्चिम येथून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय युवतीसह अनेक व्यक्तींच्या नोंदी दिसत आहेत. नागरिकांना या व्यक्तींबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिम येथून ७ ऑगस्टला बेपत्ता झालेली १९ वर्षीय जिनाद इरशाद सय्यद इस्माईल व ९ ऑगस्टला बेपत्ता झालेली २८ वर्षीय रानू सचिन यादव आणि १३ ऑगस्टला बेपत्ता झालेली २० वर्षीय चेतना अमोल गांगुर्डे यांच्या नोंदी संकेतस्थळावर आहेत. त्याच परिसरातून ८० वर्षीय हनुमान नारायण राजगे हेही ६ ऑगस्टला बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
शोधमोहीमेला वेग
मुंबईसारख्या धावत्या शहरात एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या शेवटच्या ठिकाणापासून तपासाची सुरुवात केली जाते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलची तांत्रिक माहिती, रेल्वे व बसस्थानकांवरील कॅमेरे तसेच रुग्णालयांमधील नोंदी तपासल्या जातात. पारंपरिक तपासासोबत तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शोधमोहीमेला वेग मिळत आहे.
फेशियल रिकग्निशनचीही (चेहरा ओळख तंत्रज्ञान) मदत
गर्दीच्या ठिकाणी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या ३,६७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ४६३ कॅमेरे फेशियल रिकग्निशन प्रणालीशी जोडलेले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास मदत होत आहे.
सीसीटीव्ही वरुनही शोधण्याचा प्रयत्न
विशेषतः सीसीटीव्ही फुटेज हा तपासातील महत्त्वाचा दुवा ठरत आहे. एखादी व्यक्ती एका कॅमेऱ्यात दिसल्यानंतर तिच्या पुढील हालचालींचा माग घेण्यासाठी त्याच मार्गावरील इतर कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाते. मोबाइलच्या तांत्रिक तपासातून शेवटचे लोकेशन, संपर्कातील क्रमांक आणि व्यक्तीच्या हालचालींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.