

मुंबई: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण बृहन्मुंबईत महिनाभरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. २९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून, या काळात शस्त्रे बाळगणे, घोषणाबाजी करणे, पुतळे किंवा प्रतिकृतींचे प्रदर्शन तसेच सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाऱ्या विविध कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार तलवार, भाला, चाकू, दंडुका, विनापरवाना बंदूक किंवा इतर धोकादायक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्फोटके, संक्षारक पदार्थ आणि दगडांसारखी प्रक्षेपणास्त्रे जमा करणे, वाहून नेणे किंवा त्यांचा वापर करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती किंवा प्रेताचे पुतळे, प्रतिकृती अथवा आक्षेपार्ह स्वरूपाचे साहित्य प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे. घोषणा देणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे किंवा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारचे फलक, चित्रे, चिन्हे किंवा इतर साहित्य प्रदर्शित करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुंबईत विविध सण-उत्सव, मोर्चे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१), ३७(२), कलम २(६) आणि कलम १०(२) अंतर्गत पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी जारी केला आहे.
मुंबई विमानतळ परिसरात फुगे, पतंग, लेझर बीमवर बंदी
मुंबई पोलिस आयुक्तालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम आणि आयएनएस शिक्राच्या परिसरातील विमान उड्डाण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २९ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (६० दिवस) लागू राहणार आहे.