

Shilpa Shetty Raj Kundra lookout Notice : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांच्याविरूद्ध मुंबई पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर जवळपास ६० कोटी रूपयांचा फ्रॉड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा फ्रॉड त्यांच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या आता अस्तित्वात नसलेल्या कंपनीत गुंतवणूक डील संदर्भातील आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले की पोलीस राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रवासाबाबत तपास करत आहे. याचबरोबर कंपनीच्या ऑडिटरला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. दरम्यान, व्यावसायिक दीपक कोठारी यांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले आहेत. या जोडप्यानं २०१५ ते २०२३ या दरम्यान त्यांच्याकडून जवळपास ६० कोटी रूपये घेतले. त्यांनी हे पैसे आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी घेतले होते. मात्र या जोडप्यानं हे सर्व पैसे आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले असा दावा दीपक कोठारी यांनी केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे पैसे कर्जाच्या स्वरूपात घेतले होते. मात्र त्यांनी नंतर हे पैसे कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवले.
कोठारी यांच्या मते या दोघांनी त्यांना घेतलेले पैसे ठराविक मुदतीत १२ टक्के व्याजानं परत देण्याचं आश्वासन दिलं होतं. शिल्पा शेट्टीनं २०१६ मध्ये यासाठी लिखीत वैयक्तिक गॅरेंटी दिली होती. मात्र काही महिन्यात शिल्पा शेट्टीनं संचालक पदाचा राजीनामा दिला. कोठारी यांनी सांगितलं की कंपनीने १.२८ कोटी रूपये थकवले होते हे त्यांना नंतर कळलं. याची माहिती त्यांना आधी देण्यात आली नव्हती.