Ajit Pawar Viral Video Controversy : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे महिला आयपीएस अधिकाऱ्यावर सोलापुरातील अवैध वाळू उपसण्याविरूद्ध सुरू असलेली कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांना अजित पवार यांचा व्हायरल होत असलेल्या वादग्रस्त व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, 'तुम्ही अशा प्रकारच्या फोन कॉलबाबत बोलता त्यावेळी दुसरीकडून बोलणाऱ्या त्या व्यक्तीला नेमकं प्रकरण काय आहे हे माहिती नसतं. अनेकदा हे माझ्या बाबतीत देखील झालं आहे.'
बावनकुळे पुढे म्हणाले, 'तुम्हाला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहिती नसतं. अधिकारी तुम्हाला सांगतात की हे बेकायदेशीर आहे. मात्र दुसरीकडून कार्यकर्ता सांगत असतो की हे कायदेशीर आहे. यामुळं अशा वादग्रस्त घटना निर्माण होतात. मला वाटतं की अजित पवार कोणत्याही अधिकाऱ्याला एखाद्या अनधिकृत आणि चुकीच्या कामासाठी ओरडणार नाहीत. ते असे नेते नाहीयेत. मला वाटतं की त्यांनी कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी हा कॉल केला होता. मात्र त्यांना अनधिकृत उत्खननाचा विषय आहे हे माहिती नसेल.'
अजित पवार यांचा हा वादग्रस्त फोनकॉलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मी स्थानिकांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयपीएस अंजली कृष्णा यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यानंतर एनसीपीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानं अजित पवार यांना कॉल केला अन् आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्याशी बोलायला सांगितलं. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.'