

मुंबई: मुंबई पोलीस दलात शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत विविध प्रकरणांत किमान १२ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित, तर तीन जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वेतन घोटाळा, कर्तव्यातील निष्काळजीपणा, गैरवर्तन आणि आर्थिक अनियमितता अशा प्रकरणांत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळा प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. सेवार्थ प्रणालीतील डिजिटल नोंदी, लॉगिन, वेतन मंजुरीची प्रक्रिया आणि संबंधित बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
अमली पदार्थविरोधी कारवाईशी संबंधित एका प्रकरणात तरुण आंदोलकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यात अडकवण्याची कथित धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.त्याची तात्काळ बदली करण्यात आली होती.
यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणाबद्दल पोलीस शिपाई श्याम सोनावणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी कायम ठेवण्यासाठी अशाप्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टकरण्यात आले आहे. विभागीय चौकशीतदोषी आढळणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
२०२६ मधील प्रमुख शिस्तभंग कारवाया
मुंबई पोलीस वेतन घोटाळा : दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; गुन्हे शाखेकडून तपास सुरू.
बाबा सिद्दीकी सुरक्षा प्रकरण : पोलीस शिपाई श्याम सोनावणे यांची निष्काळजीपणाबद्दल सेवेतून बडतर्फी.
विनापरवानगी गैरहजेरी : आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन, दोन कर्मचाऱ्यांची बडतर्फी.
प्रशासकीय आर्थिक अनियमितता : दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन.
एनडीपीएस आंदोलन प्रकरण : संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू.