

मुंबई: मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात कमी प्रवासी क्षमतेच्या पॉड टॅक्सीचा उपयोग तर नाहीच पण सार्वजनिक वापराच्या जागा आणि पर्यावरणावर या प्रकल्पाचा परिणाम होत आहे.
त्यामुळे पॉड टॅक्सी प्रकल्प अव्यवहार्य ठरत असून त्याचा पुनर्विचार करावा, असे म्हणत विरोध दर्शवणारे पत्र मुंबई आर्किटेक्ट्स कलेक्टिव्ह या वास्तुविशारदांच्या संघटनेने महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांना लिहिले आहे.
पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या आराखड्यानुसार वांद्रे-बीकेसी-कुर्ला या १३.५ किमीच्या मार्गावर ५४ स्थानके २०४१ पर्यंत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ३८ स्थानकांचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि अल्ट्रा पीआरटी या कंपन्या भागीदारीमध्ये हा प्रकल्प उभारणार आहेत. तिकिटाचे दर एमएमआरडीए निश्चित करेल. या कंपन्या प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम करतील, यंत्रणा उभारतील, पॉड टॅक्सीचे संचालन करतील आणि त्याच्या महसुलातील काही हिस्सा एमएमआरडीएला मिळेल, असे नियोजन आहे.
प्रतिकिमी २१ रुपये दर आकारण्यात येणार असल्यामुळे पॉड टॅक्सी हा काही मोजक्या प्रवाशांसाठीचा महागडा पर्याय ठरेल. हा प्रकल्प सर्वसमावेशक सार्वजनिक परिवहन व्यवस्था म्हणून उपयुक्त ठरणार नाही, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
तसेच अर्बन प्लाझा आणि सिटी पार्क येथे या प्रकल्पासाठीचे बांधकामाचे साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. बांधकामामुळे स्थानिक वृक्षसंपत्तीवर आणि खारफुटीवरही परिणाम होतो आहे. प्रकल्पाखालील रस्त्यांची क्षमता कमी होते आहे, इत्यादी मुद्दे पत्रात नमूद करण्यात आले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी वास्तुविशारदांनी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे.
या मार्गावर बेस्टच्या १ हजार फेऱ्या धावतात
वांद्रे-बीकेसी-कुर्ला या मार्गावर सध्या १४ बसमार्गांच्या १ हजार १९८ फेऱ्या दररोज होत आहेत. बेस्टचे किमान तिकीट ५ रुपये आहे तर पॉड टॅक्सीचे प्रतिकिमी २१ रुपये आहे. यात दरवर्षी ४ टक्के भाडेवाढ प्रस्तावित आहे.
पॉड टॅक्सीमध्ये एकावेळी ४ ते ६ प्रवासीच प्रवास करू शकतात. याउलट बसमध्ये एकावेळी किमान ४० प्रवासी प्रवास करतात. पॉड टॅक्सीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केवळ ३६ टक्के बसप्रवासी पॉड टॅक्सीसाठी २१ रुपये देण्यास तयार झाले. उर्वरित ६४ टक्के प्रवाशांचा विचार न करता पॉड टॅक्सी प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे