

Phoenix Mall Marathi language row
मुंबई : लोअर परळ परिसरातील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी भाषा दिन साजरा होऊन अवघे काही दिवस उलटले असतानाच पुन्हा एकदा मराठीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
फिनिक्स पॅलेडियम मॉलच्या मोकळ्या जागेत १५ मार्चपर्यंत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरवण्यात आले असून पुस्तकप्रेमींसाठी ‘लॉक द बॉक्स’ ही संकल्पनाही राबवण्यात येत आहे. यामध्ये १,१९९ रुपयांचा हिरवा बॉक्स, १,९९९ रुपयांचा भगवा बॉक्स आणि २,९९९ रुपयांचा गुलाबी बॉक्स असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
निवडलेल्या बॉक्समध्ये मावतील तेवढी कोणतीही पुस्तके भरून बॉक्स लॉक करायचा आणि त्यानुसार पैसे भरायचे, अशी ही योजना आहे. ‘बुकचोर’ या कंपनीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तसेच वाचकांना त्यांच्या घरातील जुनी पुस्तके विकण्याची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र, या प्रदर्शनात ठेवलेल्या शेकडो पुस्तकांपैकी बहुतांश पुस्तके इंग्रजी भाषेतील असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर हिंदी, फ्रेंच आणि जर्मन भाषेतील पुस्तकांचाही समावेश आहे. मात्र मराठी भाषेतील एकही पुस्तक येथे उपलब्ध नसल्याची बाब लक्षवेधी ठरली आहे.
मराठीबहुल भागात असलेल्या या मॉलमध्ये मराठी पुस्तकांना स्थान मिळाले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठी भाषेतील पुस्तके का ठेवली गेली नाहीत, याबाबत आयोजकांकडून स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. एवढेच नव्हे तर मराठीतील जुनी पुस्तके विकत घेण्यासही आयोजकांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे मराठी भाषेच्या उपेक्षेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा मॉल वरळी विधानसभा मतदारसंघात येतो, ज्याचे प्रतिनिधित्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करतात. तसेच या भागातील स्थानिक नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी देखील शिवसेनेशी संबंधित आहेत.
मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत सातत्याने भूमिका मांडणाऱ्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेणार का, तसेच मॉल प्रशासनाला याबाबत जाब विचारला जाणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.