

खांद्यावरील बॅग सावरताना फुटबोर्ड उभारलेल्या प्रवाशाचा तोल गेल्याने मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, असा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या लोकलमधुन प्रवासी पडले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी मध्य रेल्वेने पाच सदस्यीय समिती नियुक्ती केली. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार, कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन लोकल गाड्या सुमारे ७५ किमी प्रतितास वेगाने सिग्नल पोस्टजवळून एकमेकांना ओलांडत असताना ही दुर्घटना घडली होती. समितीने रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास केला.
रिपाेर्टनुसार, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाडीच्या सेकंड लास्ट डब्याच्या फुटबोर्डवर असलेला प्रवाशाचा आपली बॅग सावरताना तोल गेला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेला सहकारी प्रवाशांसह खाली पडला. ते दोघेही समोरून येणाऱ्या लोकलवरील प्रवाशांवर आदळले. त्यामुळे लोकलमधील काही प्रवासीही खाली कोसळले.
दोन लोकल गाड्या एकमेकांना ओलांडताना त्यांच्यातील अंतर फक्त ०.७५ मीटर किंवा २.४६ फूट असते. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून येते की, या लाेकल गाडीला गर्दी होती. दोन्ही गाड्या सुमारे ७५ किमी प्रतितास वेगाने एकमेकांना ओलांडत होत्या. इतक्या वेगात थोडासा तोल जाणेही जीवघेणे ठरू शकते, कारण शरीर बाहेरच्या बाजूला फेकले जाते आणि शेजारच्या ट्रॅकवरील ट्रेनला धडकू शकते." असे मध्य रेल्वे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या अपघातात मृत्यू झालेले प्रवासी तोल जाण्याच्या वेळी फुटबोर्डवर उभे होते. पाच जणांचा मृत्यू झाला, तर इतर तीन जण जखमी झाले. या प्रकरणी मुंबई रेल्वे पोलिसांनीही एका सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय पथकाद्वारे समांतर तपास सुरू आहे. या अपघातातून सुखरुप बचावलेल्या प्रवाशांच्या साक्षींमध्ये विसंगती दिसून आली आहे. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी मध्य रेल्वेने १५ ते १७ जून दरम्यान प्रत्यक्षदर्शींना माहिती द्यावी, असे आवाहन केले होते. मात्र याला प्रतिसाद खूपच कमी मिळाला आहे. केवळ पाच जण माहिती देण्यासाठी समोर आले आहेत, असेही एका मध्य रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.