

मुंबई : अर्ज माघारीनंतर शुक्रवारी खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचे रिंगण सजले असून लढती स्पष्ट झाल्या आहेत. मुंबई महापालिकेसाठी 227 जागांसाठी 1 हजार 729, नवी मुंबई महापालिकेच्या 111 जागांसाठी 499 तर पनवेलमध्ये 78 जागांसाठी 255 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
मुंबई महापालिका निवणडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत एकूण 2 हजार 516 अर्ज दाखल झाल होते. या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. त्यात 164 अर्ज अवैध, तर 2 हजार 185 अर्ज वैध ठरले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे मुंबईत 227 जागांसाठी 1 हजार 729 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर अनेक ठिकाणी थेट तर काही प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार असून त्यानंतर प्रचाराचा धडाका महामुंबईत सुरू होणार आहे.
पनवेलमध्ये महाविकास आघाडीला धक्का
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पनवेलमध्ये महाआघाडीच्या सात उमेदवारांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून एका अपक्ष उमेदवारालाही बिनविरोध विजय मिळाला आहे. नितीन पाटील, अजय बहिरा, दर्शना भोईर,रुचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, ममता म्हात्रे, आणि अपक्ष स्नेहल ढमाले हे विजयी झाले आहेत
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे पाच आणि शिवसेना उबाठाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. हा शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. या माघारींमुळे महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थानिक पातळीवरील असंतोष, अंतर्गत मतभेद आणि उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेली नाराजी याचा फटका थेट निवडणुकीत बसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपने मात्र या संधीचे सोने करत बिनविरोध जागांच्या माध्यमातून निवडणुकीत आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.