

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर जागावाटपात शिंदे गटालाही काही वॉर्ड सोडावे लागणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य बंडखोरीचा धोका लक्षात घेत भाजपने डॅमेज कंट्रोलची तयारी चालविली आहे. संभाव्य बंडखोर आणि नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी स्थानिक आमदार आणि खासदारांवर सोपविण्यात आल्याचे समजते. पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील भाजप कार्यालयात महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
मित्रपक्ष शिवसेनेला ८५ ते ९० जागा सोडल्या जाणार असल्याने भाजपकडे सुमारे १३५ ते १४० जागा लढण्यासाठी उपलब्ध असतील. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून नाराजी आणि बंडखोरीची शक्यता आहे. संभाव्य नाराजी आणि बंडखोरी थोपविण्यासाठी स्थानिक आमदार आणि खासदारांना पुढाकार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.