

मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या भाजप शिवसेनेने पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह १६ महापालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूरसह १३ ठिकाणी या दोन मित्रपक्षांची युती झाली आहे. जिथे या दोन पक्षांची युती आहे, तिथे दोघांनाही बंडखोरीचा मोठा फटका बसला असून बंडखोरांना शांत करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली. महायुतीत एकत्र असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्या ठिकाणी भाजपने सोबत घेतले असून पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस-शिंदे चर्चा शक्य
अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर, तर कुठे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवत आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा करून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही ठिकाणी घडामोडी घडू शकतात. युतीत झालेली बंडखोरी पाहता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
'येथे' युती साथ-साथ
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, पनवेल, वसई-विरार, चंद्रपूर, भिवंडी निजामपूर या ठिकाणी भाजप-शिवसेना युती अभेद्य राहिली आहे.