

मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळांतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सलग दोन शैक्षणिक वर्षांसाठी गणवेश खरेदीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ११८ कोटी ६६ लाख रुपये यासाठी खर्च येणार असून हा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शालेय वस्तू खरेदी करणे पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे मुंबई महापालिका दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करते. यामध्ये शालेय पुस्तकांसह दप्तर, छत्र्या, शूज, रेनकोट, पाण्याची बाटली, पेन्सिल, वह्या, गणवेश व अन्य साहित्याचा समावेश आहे.
पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि उर्दू या ८ माध्यमांच्या शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या वस्तूचे वाटप करण्यात येते.
२०२६-२७ व २०२८-२९ या शैक्षणिक वर्षाकरिता २७ शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत आहे. यात गणवेश व वह्यांचा समावेश आहे. गणवेशामध्ये शालेय गणवेश व क्रीडा गणवेशाचा समावेश आहे. या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून शुक्रवार ५ जूनला या प्रस्तावाला समितीत मंजुरी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शालेय वस्तू खरेदीसाठी यावेळी प्रथमच जेम पोर्टल याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या अगोदर राबवण्यात आलेली महाटेंडर संकेतस्थळावरील निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
वह्यांचे वाटपही शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यात
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुरवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पृषटसंख्येच्या वही पुरवण्यासह चित्रकला, निबंध वहीही देण्यात येणार आहे. या वह्यांचे वाटप शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
प्रत्येक वर्षी एक गणवेश
विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एक गणवेश तर दोन वर्षातून एकदा क्रीडा गणवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या साईज नुसार या गणवेशाचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून अखेरपर्यंत हे गणवेश मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.