

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 31 जानेवारीपूर्वी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षांनंतर अस्तित्वात येणाऱ्या महापालिकेच्या महापौरपदी कुणाला लॉटरी लागणार हे महापौर पदाच्या आरक्षणावर अवलंबून आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे महापौर आरक्षणाकडेही लक्ष लागले आहे.
मुंबईचा महापौर मराठी का अमराठी यावरून वाद सुरू असले तरी, महापौरपदाच्या आरक्षणावर महापौरपदी कोण बसणार हे ठरणार आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी महापौरपदाची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. यावेळी महापौरपदासाठी नव्याने आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे हे आरक्षण अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती महिला व खुला प्रवर्ग, ओबीसी, ओबीसी महिला, खुला प्रवर्ग महिला व खुला प्रवर्ग यापैकी कोणतेही पडू शकते. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले तर सर्वच पक्षात अनेक दावेदार असू शकतात. पण अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती यात आरक्षण पडले तर फारशी स्पर्धा होणार नाही. महापौर आरक्षणामुळे मुंबई शहराला अनुभवी महापौर मिळेल असेही नाही. जे आरक्षण पडेल त्या आरक्षणातील नगरसेवकाला महापौरपदी बसवावे लागणार आहे. या अगोदर पहिल्यांदाच निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांना महापौरपदाची लॉटरी लागली होती.
सत्ता कोणाचीही असूदे, महापौर मराठीच
मुंबई महापालिकेत सत्ता कोणाचीही आली तरी मराठीच नगरसेवक महापौरपदी बसणार आहे. केवळ राजकीय वाद निर्माण व्हावा यासाठी भाजपाने हिंदू महापौर होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु भाजपानेही आता आपली भूमिका बदलून मराठीच महापौर होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मराठी-अमराठी महापौरपदाचा तिढा सुटला आहे.