

SC Reservation in BMC Election
मुंबई : ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाप्रमाणे अनुसूचित जातीकरिता मुंबई महापालिकेत 13 टक्के आरक्षणाच्या सरसकट शिफारशीस राज्य अनुसूचित जाती आयोगाने अनुकूलता दर्शवली आहे. तसे झाल्यास पालिकेच्या 227 वॉर्डपैकी जवळपास 29 वॉर्ड एससीसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेतील अनुसूचित जातीसाठी आरक्षित वॉर्ड केवळ 15 आहेत. जे इतर महानगरपालिकांच्या तुलनेत खूपच कमी आहेत . हे आरक्षित वॉर्ड 13 टक्क्यांनी वाढवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सन 2011च्या जनगणनेनुसार मुंबई पालिकेने 227 वॉर्डची संख्या निर्धारित केलेली आहे.मात्र, मागील जनगणनेत अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींनी आपला धर्म आणि शासनमान्य सूचित जात व्यवस्थित नोंदवली नसल्याचा फटका वॉर्ड आरक्षणाला बसला असल्याचे निरीक्षण यावेळी व्यक्त करण्यात आले.
त्यामुळे आगामी काळात सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यात पुढाकार घेत अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनी धर्म आणि जात लिहिताना शासनाने मान्यता दिलेल्या जातीनुसार आपली जात आणि धर्म नोंदवा, असेही आवाहन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.
राज्यातील इतर महानगरपालिकांचा विचार करता मुंबईत केवळ एससीसाठी 13 वॉर्ड आरक्षित आहेत. आरक्षण 13 टक्क्यांनी वाढवल्यास जवळपास 29 प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित राहू शकतात असे या बैठकीत उपस्थित माजी मंत्री भाई गिरकर यांनी सांगितले. यावेळी संविधान जागर समितीचे नितीन मोरे उपस्थित होते.
2011च्या जनगणनेनंतर मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता अनेक प्रभागात बौद्ध समाजाचे प्राबल्य अधिक आहे. पुनर्वसन बांधकामामुळे जरी या मतदारांवर परिणाम झाला तरी काही प्रभागात नव्याने अनुसूचित जातीचे प्राबल्य निर्माण झालेले दिसून येते.
मागील जनगणनेत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांनी शासनाने अनुसूचित केलेला धर्म आणि जात योग्य पद्धतीने नोंदवला नसल्याने अनुसूचित जातीची संख्या मर्यादित राहिली. त्याचा मोठा फटका बौद्ध समाजाला बसला आहे.