

मुंबई: कोकणात दाखल झालेला मान्सून पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत दाखल झाला असला तरी तो पुढे सरकलेला नाही. मुंबईकरांना तर मान्सूनची आणखी प्रतीक्षा करावी लागेल. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबई केंद्राच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस मान्सूनची शक्यता नाही.
मुंबईत मान्सूनसाठी अनुकूल स्थिती सध्या नाही. त्यामुळे पुढील ३-४ दिवसांमध्ये (१० ते १३ मे) पावसाच्या सरी बरसण्याची चिन्हे नाहीत. परिणामी, मान्सूनच्या आगमनासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागेल, असे आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुष्ण नायर यांनी सांगितले.
मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे तो तळकोकणातच रेंगाळला आहे. मान्सूनच्या विलंबाने आणि वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील तलावांतील पाणीसाठा कमी झाला आहे.मान्सून सोमवारी सोलापुरातून बारामती तालुक्यात आला.
मात्र मंगळवारी पुढे न सरकता तिथेच मुक्कामी राहिला. त्यामुळे पुणे आणि मुंबई शहरातील त्याचे आगमन लांबले आहे. दरम्यान, मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने पश्चिम बंगालसह संपूर्ण ईशान्य भारत व्यापला असून तो बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापत आहे.
राज्यात ६ जून रोजी मान्सून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापुरात आला. तेथे दोन दिवस मुक्काम करून ८ जून रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात आला. लगेच पुढे बारामती तालुक्यात आला. सोमवारी बारामती येथे ५०.८ मि. मी. पाऊस झाला.
मात्र जिल्ह्यात कुठेही मोठा पाऊस झाला नाही. मान्सून वाऱ्यांना बळकटी कमी असल्याने तो ज्या भागातून जात आहे तेथेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात अजूनही असह्य उकाडा जाणवतो आहे.