

Mumbai monorail
मुंबई : मुंबईतील मोनोरेल सेवा आज (दि. १५) पुन्हा एकदा विस्कळीत झाली. वडाळ्याच्या दिशेने जाणारी एक मोनोरेल वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अचानक थांबली. यामुळे प्रवासी अडकून पडले. त्यानंतर, चेंबूरहून येणाऱ्या दुसऱ्या मोनोरेलमधून त्यांना बाहेर काढण्यात आले.
अडकलेल्या गाडीतून १७ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मोनोरेल सकाळी ७:४५ वाजता थांबली होती. प्रवाशांना इतर गाडीतून पुढील प्रवासाची सोय करून देण्यात आली. वडाळा परिसरात सुमारे दीड तास थांबलेली मोनोरेलचा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. या घटनेबाबत आरपीआय (आठवले) चे नगरसेवक राजेश आनंदा भोजणे यांनी सांगितले की, “वडाळ्याकडे जाणारी मोनोरेल मध्येच थांबली. अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण दिले. सरकारने या वारंवार होणाऱ्या समस्या लवकर दूर कराव्यात अशी विनंती आहे.”
याआधीही अशीच घटना घडली होती. ऑगस्टमध्ये चेंबूर आणि भक्ती पार्कदरम्यान गर्दीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने ५८२ प्रवासी तीन तासांपेक्षा जास्त वेळ अडकून पडले होते. त्या घटनेत २३ जणांना जागेवरच गुदमरल्यासारखे वाटल्याने त्यांच्यावर उपचार करावे लागले, तर दोघांना सायन रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी बीएमसी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य केले होते. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्नॉर्कल वाहनांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर, त्यांना जवळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचवण्यासाठी बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली होती.