

मुंबई: एक लाखांहून अधिक गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागाच नसल्याने त्यांना कुठे कशी घरे द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार महामुंबईत जागेचा शोध घेत आहे, मात्र मुंबईतच घरे देण्याची ठाम भूमिका मोठ्या संख्येने कामगारांची आहे.
त्यामुळे मुंबईतच अधिकाधिक कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.
८ ऑक्टोबर रोजी गिरणी कामगारांच्या घरासाठी स्थापन केलेल्या गृहनिर्माण विभागाचे मुख्य अप्पर सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक सचिन अहिर यांच्या दालनात पार पडली. या बैठकीला १६ कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा झाली. बैठकीला गिरणी कामगार लढा समिती निमंत्रक गोविंद मोहिते, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, विजय कुलकर्णी, बाळ खवणेकर, विवेकानंद बेलूसे, रमाकांत बने, ॲड. बबन मोरे, आनंद मोरे, हरिनाथ तिवारी, ॲड. अरुण निंबाळकर आदी उपस्थित होते.