

मुंबई : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेचे काम प्रगतिपथावर असले तरी अद्याप कारशेडचा प्रश्न सुटलेला नाही. कांजूरमार्ग जागेचा वाद अद्याप मिटलेला नसल्याने कारशेडचे काम सुरू होण्यास बराच कालावधी जाईल. तोपर्यंत स्टॅबलिंग लाइनची सोय करून त्याद्वारे मेट्रो 6 मार्गिका सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
आरे ते बीकेसी मेट्रो 3 मार्गिकेची कारशेड आरे वसाहतीत बांधण्याचा निर्णय 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. या निर्णयाला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. त्यानंतर 2020 साली आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आरे ते बीकेसी मेट्रो 3, कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 या तीन मेट्रो मार्गिकांच्या कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला. यानुसार कांजूरमार्ग येथील 102 एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली.
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र सरकारने आपली मालकी सांगितल्यानंतर 16 डिसेंबर 2020 रोजी उच्च न्यायालयाने कारशेडच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे कांजूरमार्ग येथे अद्याप काम सुरू होऊ शकलेले नाही. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार ही जमीन मिठागरे खात्याच्या मालकीची असून ती 1917 साली 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. त्यानंतर 2004 साली हा भाडेकरार रद्द करण्यात आला. 2016 साली संपलेल्या या भाडेकराराचा वाद शहर दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे.
न्यायालयीन प्रकरणातील गुंतागुंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कांजूरमार्गच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम एमएमआरडीएला करता येणार नाही. मात्र यामुळे मेट्रो मार्गिकेचे संचालन रखडणार आहे. यावर उपाय म्हणून आता परीक्षण मार्गिका आणि स्टॅबलिंग लाइनचा वापर केला जाणार आहे. या मार्गिकांवरच मेट्रोगाड्या उभ्या राहतील व तेथेच त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाईल. यामुळे मेट्रो 6 मार्गिका नियोजित कालावधीत सुरू करणे शक्य होणार आहे.
मेट्रो फेऱ्या मर्यादित
मेट्रो 6 मार्गिकेचे मुख्य बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. इतर कामे 7 टक्के पूर्ण झाली आहेत. मेट्रो प्रणालीच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्च 2027 पर्यंत मेट्रो 6 प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज होईल. स्टॅबलिंग लाइनच्या सहाय्याने मेट्रो मार्गिका चालवली जाईल; मात्र त्यावर फक्त नियमित देखभाल दुरुस्ती शक्य आहे. तसेच कारशेड नसल्याने मेट्रो फेऱ्या मर्यादित असतील. पूर्ण मार्गिका सुरू होण्याबाबत साशंकता आहे. कारशेड मिळेपर्यंत ही मार्गिका अंशत: चालवली जाऊ शकते.