

Mumbai Underground Metro Mobile Network Issue
मुंबई : मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील नेटवर्क अचानक बंद पडल्याने मेट्रो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. वोडाफोनने सेवा पूर्ववत केली असली तरी जिओ आणि एअरटेलने अद्याप नेटवर्क बंदच ठेवले आहे.
एमएमआरसी भरमसाट शुल्क आकारत असल्याचे कारण देत काही दिवसांपासून जिओने भुयारी मेट्रोमधील नेटवर्क सेवा बंद केली आहे. तरी, प्रवाशांकडे वोडाफोन आणि एअरटेलचा पर्याय होता; पण त्यानंतर या कंपन्यांनीही अचानक सेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली. भुयारी मेट्रोच्या आवारात प्रवेश करताच फोनचे नेटवर्क जात आहे. मेट्रोने प्रवास करतानाही प्रवाशांना फोनवर बोलता येत नाही व इंटरनेटही वापरता येत नाही. तसेच ऑनलाईन तिकीट काढणे शक्य नसल्याने कागदी तिकिटांचा वापर करावा लागत आहे.
नेटवर्क सेवेसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा पुरवण्यासाठी एमएमआरसीने मार्च 2024मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. त्याद्वारे एसीईएस या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या कंपनीने पुरवलेल्या यंत्रणेचा वापर करून जिओ, वोडाफोन, एअरटेल या कंपन्या नेटवर्क सेवा देत होत्या; मात्र अचानक या कंपन्यांनी सेवा खंडित केली. या कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल का, याबाबत चाचपणी सुरू आहे. दरम्यान वोडाफोनने आपली सेवा शनिवारी पूर्ववत केली असून यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.