

Terrorist arrest in Mumbai
मुंबई : पुण्यात अतिशक्तिशाली बॉम्बची चाचणी करून फरार झालेले आणि 2 वर्षांपासून इंडोनेशियात दडून बसलेले ‘इसिस’च्या स्लीपर सेलचे 2 संशयित दहशतवादी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एनआयए’ने शनिवारी जेरबंद केले.
महाराष्ट्रासह देशभर घातपाती कारवाया करण्यासाठी पुण्यात ‘इसिस’ने सुरू केलेल्या छुप्या तळावर म्हणजेच स्लीपर सेलसाठी अब्दुल्ला फय्याज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्लाह खान काम करत होते. इंडोनेशियातील मुक्काम आटोपून आपल्या कारवाया सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचा बेत त्यांनी आखला. शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर ते उतरताच इमिग्रेशन ब्यूरोने त्यांना रोखले.
देशभर स्फोटांची मालिका घडवण्याचा कट त्यांनी आखला होता आणि पुण्यातील ही चाचणी त्याचाच एक भाग होता. मात्र, चाचणी स्फोटाने ‘इसिस’च्या स्लीपर सेलचेच बिंग फुटले आणि हे दोघे फरार झाले होते. दोघांवरही ‘एनआयए’च्या मुंबईतील विशेष न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यांच्या अटकेसाठी माहिती देणार्यास 3 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
इंडोनेशियाची राजधानी जाकार्तामधील मुक्काम आटोपून हे दोन्ही दहशतवादी परतले आणि ‘एनआयए’च्या तावडीत सापडले. या दहशतवाद्यांचे साथीदार सध्या तुरुंगात असून, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेले आहे. एकूण 10 जणांची ही टोळी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होती. देशभर बॉम्बस्फोट मालिका घडवून हाहाकार उडवण्याचा त्यांचा कट होता. या टोळीतील शेवटचे दोघेही हाती लागल्याने दहशतवादाबद्दल भारताला शून्य सहिष्णुता आहे, हे धोरण पुन्हा अधोरेखित झाल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. डायपरवाला आणि तल्लाह खान या दोघांनाही मुंबईतील ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
जुलै 2023 रोजी बाईक चोरीच्या गुन्ह्यांत युनूस साकि आणि इम्रान खान या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर आयसिसचा हा संपूर्ण कट उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांच्या इतर सहा सहकार्यांना एनआयएने अटक केली होती.
‘एनआयए’ने आतापर्यंत मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साखी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फीकार अली बडोदावाला, शमील नाचन, अकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांना अटक केली आहे. मात्र, स्लीपर सेलचे डायपरवाला आणि तल्लाह खान दोघांचाही शोध सुरूच होता. पुण्याच्या कोंढव्यात या सर्व हस्तकांनी ‘इसिस’चा स्लीपर सेल भाड्याच्या घरात सुरू केला होता. 2022 ते 2023 दरम्यान त्यांनी याच घरात बॉम्ब तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. कोंढव्यातच तयार केलेल्या अत्याधुनिक व शक्तिशाली बॉम्बची चाचणी त्यांनी घेतली.
अब्दुल्ला फय्याज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्लाह खान दोघेही इसिसच्या स्लीपर सेलचे सदस्य आहेत. त्यांच्यावर इसिसने भारतात हिंसाचार आणि दहशतीद्वारे इस्लामिक राज्य स्थापित करण्याचा अजेंडा पुढे नेण्यासाठी युद्ध पुकारण्याचे मिशन सोपवले होते.