Mumbai Metro | मेट्रो-4 सुरू होण्यासाठी चार वर्षात तारीख पे तारीख

डिसेंबर 2025 नंतरच ठाण्यातून मेट्रो-4 धावणार, तळोजा प्रकल्पास 2026 उजाडणार?
 Metro Rail
Metro Rail
Published on
Updated on

ठाणे : मुंबई आणि ठाण्याला जोडणारा आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली अशा मेट्रो-4 चे काम अजूनही पूर्ण झाले नाही. गेल्या चार वर्षातील शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या डेडलाईन देण्यात आल्या असून यामध्ये आता डिसेंबर 2025 नंतरच मेट्रो - 4 ही ठाण्यातून धावेल, अशी नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.

Summary

दररोज जीवघेण्या वाहतूक कोंडीचा सामना करणार्‍या नागरिकांसाठी मेट्रो-4 हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. मात्र चारवेळा देण्यात आलेल्या डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास न आल्याने या प्रकल्पाच्या संदर्भात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात राजकीय नेते आणि राज्य शासन अपयशीच ठरले असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

ठाणे शहरामध्ये मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून 2017 पासून मेट्रो प्रखल्पाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. गेल्या 8 वर्षांमध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेटींग करून मेट्रोचे खांब उभारण्याची कामे सुरू असून ही कामे अंतीम टप्प्यात आली आहेत. काही ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू असून आत्तापर्यंत वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे 67 टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास आली आहेत, अशी माहिती एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र ज्या गतीने हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली होती त्या वेगात हे काम सुरू नसल्याचे दिसत आहे. मेट्रो -4 हा प्रकल्प नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच रखडला आहे.

आता हा प्रकल्प सुरु होण्यासाठी डिसेंबर 2025 ही नवीन तारीख एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली असल्याने मेट्रो-4 मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना जवळपास 2026 उजाडण्याची वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.नवी मुंबई मेट्रो बांधून पुर्ण झाल्यानंतरही उद्घाटनासाठी एक वर्ष खोळंबून पडल्याचे यापूर्वीच्या अनुभवामुळे ठाणे मेट्रोबद्दलही पुढील दिरंगाईची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी शासनाकडून या भागातील गृहखरेदी विक्री व्यवहारावर मेट्रो सेजही लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महामार्गाच्या सेवा रस्त्यांच्या लगतच वेगाने कामे सुरू करण्यात आली होती. मेट्रो सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून सेजच्या माध्यमातून नागरिकांकडून शासकीय शुल्क आकारण्यात येत असले तरी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मेट्रो प्रकल्प
मेट्रो प्रकल्पाच्या डेडलाईनPudhari News Network

मेट्रो पूर्णत्वाच्या आतापर्यंतच्या डेडलाईन...

  • सुरुवातीला 2021-22 मध्ये मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. त्यानंतर आलेल्या करोनामुळे मेट्रो प्रकल्पाची कामे रखडली.

  • या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 ची नवी तारीख देण्यात आली होती. या तारखेला देखील प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

  • त्यानंतर जून 2025 ची नवीन तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु नुकत्याच प्रसिध्द झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून आता हा प्रकल्प डिसेंबर 2025 नंतर पुर्ण होऊ शकणार आहे.

  • याशिवाय या प्रकल्पाचा दुसरा टप्पा असलेला कासारवडवली-गायमुख हा प्रखल्पही डिसेंबर 2025 नंतरच प्रत्यक्षात येणार आहे.

ठाणे-भिवंडी, कल्याण तळोजा प्रकल्पास 2026 उजाडणार...

ठाणे-भिवंडी-कल्याण प्रकल्प 2019 मध्ये सुरू झाला असून ही मेट्रो 2023-24 पर्यंत होण्याचे ठरले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2024, डिसेंबर 2025 आणि आता जून 2026 पर्यंत लांबले आहे. तर 2023 मध्ये सुरू झालेल्या कल्याण-तळोजा मेट्रोटे काम ऑक्टोबर 2026 वरून आता डिसेंबर 2027 पर्यंत लांबल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news