

मुंबई : जवळपास ९४ आउटलेट्स चालवणाऱ्या दोन रेस्टॉरंट चालकांना उच्च न्यायालयाने झटका दिला. कॉपीराइट उल्लंघनाचा प्रथमदर्शनी पुरावा आढळल्यानंतर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडच्या (पीपीएल) संगीत संग्रहातील संगीत परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी वाजवण्यास मनाई केली आहे. संगीताचा अनधिकृत वापर केल्यास पीपीएलचे नुकसान होईल. त्यामुळे अंतरिम संरक्षणाची आवश्यकता आहे, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.
सार्वजनिक ठिकाणी संगीत वाजवण्याच्या रेस्टारंट चालकांच्या कृत्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पीपीएल कंपनीने यासंदर्भात दोन अंतरिम अर्ज केले होते. त्यावर न्यायमूर्ती देशमुख यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. प्रतिवादी रेस्टारंट चालक कॉपीराइट असलेल्या ध्वनी रेकॉर्डिंग वापर करण्यासंबंधी स्वतःचा कोणताही कायदेशीर हक्क दाखवू शकले नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले.
पीपीएल कंपनीने त्रिनेत्र व्हेंचर आणि अनूर परिपती रेस्टॉरंट चालकांविरोधात अंतरिम अर्ज दाखल केले होते. विशेष परवाना करारांनुसार याचिकाकर्ती कंपनी मोठ्या ध्वनी रेकॉर्डिंग संग्रहाच्या कॉपीराइटची मालक तसेच विशेष परवानाधारक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
कॉपीराइट कायद्यानुसार ध्वनी रेकॉर्डिंगच्या सार्वजनिक सादरीकरणासाठी परवाने देण्याचा अधिकार पीपीएल कंपनीलाच आहे. असे असताना रेस्टारंट चालकांनी कंपनीची परवानगी न घेता संगीत वाजवण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधातील पीपीएल कंपनीचा आक्षेप योग्य ठरवत न्यायालयाने दोन रेस्टारंट चालकांना संगीत वाजवण्यास मनाई केली आहे.