

मुंबई: २०१६ मध्ये दोघा शिक्षकांना केलेल्या मारहाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. मानथकर यानी सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या तावडे यांना एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. एवढेच नाही तर पुढील तारखेच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास बेल बाँड रद्द करून वॉरंट काढले जाईल, अशी तंबीच महापौर रितू तावडे यांना दिली.
२९ जुलै २०१६ रोजी वाकोला परिसरातील पालिकेच्या उर्दू माध्यम शाळेत ही घटना घडली होती. शाळेतील एका महिला शिक्षिकेची बदली वांद्रे-कुर्ला संकुल येथील दुसऱ्या विभागात करण्यात आली होती.
संबंधित शिक्षिका कर्करोगाने ग्रस्त असल्याने तिच्या बदलीला विरोध करण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते. तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका व इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
यावेळी दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३३२ (दुखापत करणे) आणि ५०४ (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तावडे यांनी त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुरावे लक्षात घेत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे आधार असल्याचे स्पष्ट दोषमुक्त करण्यास नकार दिला होता.
त्यानंतर न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा निर्णय घेतला. मागील सुनावणीच्या वेळी गैरजर राहिल्याने न्यायालयाने तावडे यांना तीनशे रुपयांचा दंड ठोठावला होता. आज पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी केली.