Mumbai BMC Election: पिक्चर अभी बाकी है...; मुंबईत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला? शिंदेंची सेना थेट ५ स्टार हॉटेलमध्ये
Mumbai BMC Election
मुंबई : मुंबईत अडीच-अडीच वर्षे महापौर पद विभागून द्यावे, अशी मागणी आता शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी आणि नेत्यांनी केली आहे. २३ जानेवारीपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून, या विशेष वर्षात शिवसेनेचा महापौर असावा, अशी इच्छा या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम
शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी यापूर्वी एका मुलाखतीत नमूद केल्यानुसार, प्रत्येक वेळी भाजपच्या मदतीनेच शिवसेनेचा महापौर पदावर बसला आहे; त्यामुळे या वेळीही तशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर, शिंदे सेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. ते पुढील दोन ते तीन दिवस तिथेच मुक्कामी असतील.
मुंबईचा महापौर भाजपचा होणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही संधी मिळणार, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असेल. या राजकीय घडामोडींमुळे मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपने दणदणीत ८९ जागा जिंकल्या
मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने दणदणीत ८९ जागा जिंकल्या. या चुरशीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीने २२७ सदस्यीय महानगरपालिकेत ११८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले. गेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. या लढाईत शिंदे सेनेची मात्र पिछेहाट झाली. जेमतेम २९ जागांवर शिंदे सेनेला समाधान मानावे लागले. याउलट भाजपने मात्र आजवरच्या सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या. फंदफितुरी होऊनही ठाकरेंनी ६५ जागा खेचून आणल्या. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ५२ जागा लढूनही फक्त ६ जागा जिंकता आल्या. २४ जागांवर घसरलेल्या काँग्रेसला स्थानिक नेत्यांनीच केलेला दगाफटका भोवला.

