

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात सत्तावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याने 31 जानेवारीला ठरलेली मुंबई महापौरपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. मंत्रालय आणि महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या चिटणीस विभागाने परस्पर ठरवलेला 31 जानेवारीचा मुहूर्त सत्तारूढ भाजप-सेनेच्या गैरसोयीचा होता. आता जानेवारीअखेर नवा मुहूर्त जाहीर केला जाईल.
मुंबई महापालिच्या चिटणीस विभागाने महापौरपदाची निवडणूक आधी 28 जानेवारीलाच ठरवली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याचा विचार करून 31 जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. तो जाहीरही करण्यात आला. तोपर्यंत सत्तारूढ पक्षांनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही. आता हा मुहूर्त ठरवताना चिटणीस विभागाने घाई केल्याचा ठपका महायुतीकडून ठेवला गेला आणि मंत्रालयातील चक्रे फिरली.
स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती या चार वैधानिक समित्यांचे अध्यक्ष पदे, विशेष समित्यांचे अध्यक्ष पदे आणि सभागृह नेते पद, तसेच, 18 प्रभाग समित्यांची अध्यक्ष पदे याबाबत अद्यापही भाजप आणि शिवसेनेत ( शिंदे) चर्चा-एकमत झालेले नाही.
विशेष म्हणजे कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजप-सेनेचे स्वतंत्र गट नोंदवायचे की महायुती म्हणून एकच गट नेोंदवायचा याचाही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून मुंबईत परतल्यानंतर महायुतीची बैठक होईल आणि हे सारे निर्णय घेतले जातील.
22 जानेवारीला निवडणूक निकालांची अधिसूचना जारी झाली. महापौर निवडणूक घेण्यास 22 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ आहे. 2017 साली 10 फेब्रुवारीला निवडणूक झाल्यानंतर थेट 9 मार्चला महापौर निवडणूक झाली होती. त्यामुळे आता 31 जानेवारीचा मुहूर्त बारगळला असला तरी या महापौर निवडीसाठी भरपूर अवधी हाती आहे.