

मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ या तिघांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. 2021 मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंदर्भात निर्दोष मुक्त केल्याने ‘ईडी’नेही या प्रकरणात दोषमुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज भुजबळ कुटुंबीयांनी केला होता.
या अर्जावर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर सुनावणी झाली. 2021 मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंदर्भात निर्दोष मुक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशानुसार ‘ईडी’चा खटला चालू राहू शकत नाही, असा दावा भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. तो मान्य करत न्यायालयाने छगन भुजबळांसह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांना दोषामुक्त केले.