

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
मुंबईतील मतदारात मराठी मते आपलीच असा दावा मराठीबहुल भागात शिवसेना आणि उबाठा अशा दोन्ही पक्षानी केला असून दादर माहीम भांडुप विक्रोळी बोरिवली, मागाठाणे या मराठी भागा तील वॉर्डावर दोघांनीही दावा केला आहे. वॉर्डनिहाय चर्चा करीत जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याने दोन्ही भावांचे पक्षनेते गेले 3 दिवस चर्चा करत आहेत.
ठाकरे बंधूंमध्ये मराठी मतांवरून जागा वाटपात प्रचंड खल सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित रित्या सामोरे जाणार हे निश्चित असले तरी नेमक्या कुणाच्या कोणत्या जागा याबद्दलचा काथ्याकुट गेले तीन दिवस सातत्याने सुरूच आहे. मुंबईतील 227 वॉर्डापैकी 123 वॉर्डात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चार टक्क्यांपेक्षा जास्त मते मनसेने मिळवली आहेत. चार टक्के मतांची आघाडी महापालिकेचे चित्र फिरवणारी असल्याने यावेळी मनसे भावाला टाळी देताना त्याचे मूल्य वसूल करण्याच्या तयारीत आहे.
मनसेने मिळवलेल्या मतांची संख्या जिंकलेल्या उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा 67 वॉर्डात जास्त असल्याने मनसे हा निकाल बदल णारा घटक आहे हे निश्चित. येत्या दोन ते तीन दिवसात युतीची चर्चा अंतिम होणार असली तरी सध्या एकेका वॉर्डातील गणिते जुळवताना दोघांच्याही प्रभावाचे वॉर्ड समान असल्याचे लक्षात येते आहे. दादर माहीम विक्रोळी भांडुप मागाठणे बोरिवली विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघंवर शिवसेना उबाठा आणि मनसे या दोघांनीही आपापले दावे सांगितले आहे.
या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना चांगली मते मिळू शकतात अशी आकडेवारी सादर केली. आम्हाला योग्य त्या जागा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह मनसेने धरला आहे. हा आग्रह शिवसेना उबाठाला मान्य आहे मात्र त्यासाठी 60 वॉर्ड देण्याची तयारी दाखवली गेली आहे. मनसेला केवळ साठ वॉर्डांवर समाधान वाटत नसून 75 ठिकाणी आम्हाला लढण्याची संधी द्या.आमचा पक्ष देखील या निवडणुकीत उभा राहू द्या अशी भूमिका घेण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा चे नेते अनिल परब आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात चर्चांच्या या फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक वॉर्डनुसार चर्चा केली जात असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला नक्की निवडणूक कुठे लढायची आहे आणि कोण चेहरा असेल याबद्दल उत्सुकता लागली आहे.
सोमवारी भाजप-सेना शिंदेगटात चर्चा!
भारतीय जनता पक्षाला उच्च मध्यमवर्गीय मराठी आपल्याकडे येतील याबद्दल विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाभार्थी योजना आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरू असलेली लाडकी बहीण योजना यामुळे गरीब वर्गातील मतेही मिळण्याचा विश्वास पक्षातर्फे व्यक्त केला जातो आहे. एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी देखील या निकषांवर दावा केला असून मराठी मते आमचीच असे सांगण्यात सुरुवात केली आहे. या सोमवारी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातही चर्चेची फेरी होईल. तर भारतीय जनता पक्षाच्या निर्णय निश्चित न झालेल्या वार्डांबद्दल देखील चर्चा होईल.
युवासेना सक्रीय; वरूण सरदेसाई चर्चेत
मनसेशी होणाऱ्या चर्चेत शिवसेना उबाठाने नव्या पिढीला सक्रीय केले आहे. आदित्य यांचे निकटचे सहकारी सूरज चव्हाण आणि आमदार वरूण सरदेसाई चर्चेच्या प्रत्येक फेरीत सहभागी होत आहेत असे समजते.