

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजप - शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपाची चर्चा दीडशे जागांवरच थांबली आहे. दोन दिवसांपूर्वीच या जागांवर एकमत झाले होते. गुरुवारच्या बैठकीत हा आकडा पुढे सरकू शकला नाही. उर्वरित 77 जागांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
अनिर्णित राहिलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात महायुतीच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमीत साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर उपस्थित होते. तर, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले, 150 जागांवर आमचे पूर्ण एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांवर येत्या दोन-चार दिवसांत चर्चा पूर्ण करून अंतिम निर्णय घेतला जाईल. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे साटम म्हणाले.
नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी संबंध नाही : साटम
महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण दिले नव्हते का, असा प्रश्न विचारला असता अमित साटम म्हणाले, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे काही देणघेणे नाही, अशी आमची भूमिका आहे. मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. मुंबईसाठी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आहेत, राष्ट्रवादीने मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करु इच्छित नाही. उद्या राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कोणा नेत्यावर मुंबईची जबाबदारी दिली तर त्यांचे स्वागत आहे, अशी भूमिका साटम यांनी मांडली.
अनिर्णित जागांवर फडणवीस-शिंदे निर्णय घेतील : उदय सामंत
या बैठकीत 150 जागांबाबत चर्चा झाली. 77 अनिर्णित जागांबाबत एक-दोन दिवसांत चर्चा होईल. कोण किती जागा लढतो, यापेक्षा महायुती म्हणून आम्ही पुढे जात आहोत. 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निश्चिय आम्ही केला आहे. तिकिट वाटप जाहीर होईल, तेव्हा कोणाला किती जागा मिळाल्या, हे तुम्हाला कळेल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.