Manori Desalination Plant
मुंबई : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वीसुध्दा काढण्यात आलेल्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याने ही निविदा प्रक्रियाच महापालिकेकडून रद्द करण्यात आली. मात्र आता नव्याने निविदा प्रक्रिया करण्याच्या पालिकेला राज्य सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर त्यानुसार पुन्हा एकदा नव्याने निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मुंबईला तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा, विहार आणि तुळशी तलावातून मुंबईला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबई महापालिकेने केलेल्या अभ्यास अहवालानुसार 2041 पर्यंत मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्या स्थितीत प्रतिदिन 6 हजार 426 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असेल.
ही गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. हा खर्चिक व सोयीचा प्रकल्प नसल्याने विरोध झाला. शिवाय काढण्यात आलेल्या निविदांनाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. आता पुन्हा निविदा प्रक्रिया सुरु करून प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे.
या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मुंबईकराना मिळणार आहे. नंतर दुसर्या टप्प्यातही हीच क्षमता वाढवून 400 दशलक्ष लीटर पाणी यातून मुंबईकरांना मिळेल. मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असून ज्यामध्ये अक्षय ऊर्जा वापरली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.