

Water shortage crisis on Mumbaikars
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे पाणी साठे, तलाव, धरणातील जलाशयांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. तसेच मागणीही वाढली आहे. त्यामुळे पाणी साठा खालावत चालला आहे. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार असून, येणाऱ्या काळात मनपा प्रशासनाकडून पाणी कपात करण्यात येण्याची शक्यता आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत गेल्या महिनाभरात पाणीसाठ्यात झपाट्याने बदल झाल्याचे समोर आले आहे. महिनाभरात १६ टक्के घट झाल्याने आता तलावांतील साठा २६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे.
मुंबई शहराची मोठ्या लोकसंख्येच्या घनतेमुळे या ठिकाणी पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे प्रशासनाला या लोकसंख्येची पाण्याची गरज भागावावी लागते. तसेच पावसाळा सुरू होउन तलावात पाणी साठा होईपर्यंत या तलांवांमधील पाण्याचे जून महिन्यापर्यंत नियोजन करावे लागते.
महिनाभरापूर्वी पाणीसाठा ६ लाख १६ हजार दशलक्ष लिटर होता. तो आता ३ लाख ८८ हजार दशलक्ष लिटरपर्यंत खाली आला असून, त्यामध्ये १६ टक्के इतकी घट झाली आहे. त्यामुळे १४ मे पर्यंत सातही तलावातील पाणीसाठा १० टक्क्यांवर येईल, असे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पाण्याची वाढती घट लक्षात घेता लवकरच साठ्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तसेच जर पाणी कपात करायची असेल तर ती कधीपासून करायची याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून पाण्याचा वापर अधिक होतो. मात्र मनपाकडून पाणी कपात करण्यात येणार असल्याने नागरिकांनीही पाण्याचा जपूण वापर करणे गरजेचे आहे.