

मुंबई: मुंबईकरांची वाढती पाण्याची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने मनोरी येथे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पिण्याच्या पाण्यात रूपांतर करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी २ हजार २४१ कोटी रुपयांच्या कंत्राटाला पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मनोरी येथून तयार होणारे पाणी पश्चिम उपनगरातील चारकोप व कांदिवलीतील महावीर नगरपर्यंत पोहोचविण्यासाठी ७.२ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलवाहिनी बोगदा उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात मोठी भर पडण्याची अपेक्षा असून, पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पिण्यायोग्य पाणी तयार केले जाणार आहे. भविष्यात या प्रकल्पाची क्षमता ४०० एमएलडीपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.
समुद्राच्या पाण्यातील क्षार व अन्य अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २९ हेक्टर जागेचा वापर प्रस्तावित आहे. प्रकल्पाची किंमत ४ हजार ०७७ कोटी रुपये आहे.
पर्यावरणाच्या समतोलाचे पालिकेसमोर आव्हान
मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असला, तरी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. डिसेंबर २०२९ पर्यंत पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.
मच्छीमारांना उपजीविका गमाविण्याची भीती
या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता, मासेमारी व्यवसाय आणि स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती मनोरी, गोराई आणि उत्तन परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध असून काही दिवसांपूर्वीच वांद्रेतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी संताप व्यक्त केला होता.