Mahalaxmi Temple Mumbai: मुंबईवर महालक्ष्मीचा वरदहस्त! नवरात्रोत्सवात लाखो भाविकांची मंदिरात गर्दी

धावपळीच्या युगात मुंबईला विसावा देणारी 'महालक्ष्मी'; नवरात्रोत्सवात भक्तीचा अनोखा जागर!
Mahalaxmi Temple Mumbai
Mahalaxmi Temple MumbaiPudhari
Published on: 
Updated on: 

अदिती कदम

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराने आपले स्थान कायम आजपर्यंत राखले आहे. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या भुलाभाई देसाई मार्गावरील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

या मुंबईवर आणि मुंबईकरांवर महालक्ष्मीचा वरदहस्त असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी, मंदिरातील धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त होते.

Mahalaxmi Temple Mumbai
Maharashtra FDA Action: मुदतबाह्य अन्न विक्री; रिलायन्स, झोमॅटोचे पाच परवाने निलंबित

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती विराजमान आहेत. व्यापारी धाकजी दादाजी यांनी या मंदिराची उभारणी केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या स्थापनेमागे मुंबईच्या इतिहासाशी जोडलेली एक रंजक आख्यायिका आहे.

ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिराची अलौकिक गाथा

तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी या बेटांदरम्यानचा समुद्रमार्ग भरणी करून जोडण्याची योजना आखली होती. त्या काळात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी भायखळ्यापर्यंत पोहोचत असे.

मुंबईहून वरळीला जाण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागत होता. या दोन भागांना जोडण्यासाठी खाडीमध्ये बांध घालण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामाची जबाबदारी रामजी शिवजी या अभियंत्याकडे सोपविण्यात आली होती.

Mahalaxmi Temple Mumbai
Anandnagar Saket Elevated Road Accident: चालत्या कारवर लोखंडी सांगाडा कोसळला! आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या कामात अपघात

आख्यायिकेनुसार, बांधाचे काम वारंवार समुद्राच्या पाण्यामुळे कोसळत होते. त्यामुळे कामात अडथळे येत होते. अशा वेळी महालक्ष्मीने रामजी शिवजी यांना स्वप्नात दृष्टांत दिला. आपण आपल्या बहिणींसह समुद्राच्या तळाशी असल्याचे सांगून मूर्ती बाहेर काढण्यास सांगितले. सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास ठेवला गेला नाही. मात्र, बांधाचे काम वारंवार अयशस्वी होत असल्याने अखेर समुद्रात मूर्तींचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्राच्या तळाशी शोध घेतला असता महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती सापडल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी जागा देण्यात आली. पुढे वरळीचा बांध पूर्ण झाला आणि देवीच्या कृपेने कामातील अडथळे दूर झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

नवरात्रात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. ऑक्टोबरमधील उष्णतेचा तडाखा सहन करत शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी मंदिरापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे ४० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली.

अष्टमीला होमहवन आणि पूर्णाहुती

नवरात्रोत्सवात अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात होमहवन आणि पूर्णाहुतीसह विविध धार्मिक विधी केले जातात. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक नवस व्यक्त करतात, तर काही भाविक नवसपूर्तीनंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

मुंबईच्या ऐतिहासिक जडणघडणीशी जोडलेले महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून मुंबईकरांच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी या श्रद्धेची साक्ष देते. इतरवेळीही भक्तांची येथे गर्दी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news