

मुंबई: मेट्रो मार्गिकांच्या कामांमध्ये वारंवार अपघातांच्या घटना समोर येत असताना शनिवारी आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाच्या बांधकामादरम्यानही अपघात झाला. पुलाच्या खांबाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सळ्यांचा सांगाडा चालत्या कारवर कोसळला. यामुळे कारच्या काचेचा चक्काचूर झाली. यात कोणालाही दुखापत झाली नाही.
पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर ते साकेत असा ८.२४ किमीचा उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स यांच्याकडे आहे. या पुलासाठी खांब उभारणीचे काम सुरू असताना लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोपरी पुलावरून जाणाऱ्या कारवर कोसळला.
अपघातानंतर नुकसानग्रस्त वाहन घटनास्थळावरून हलवण्यात आले व सळ्यांचा सांगाडा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला.
कंत्राटदाराला २ कोटी रुपयांचा दंड
या घटनेप्रकरणी एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक त्रुटींचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.