

मुंबई: मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने राज्यात मोठी कारवाई केली आहे.
भिवंडी, अंबरनाथ आणि पुणे जिल्ह्यातील चाकण व निघोजे येथे राबविलेल्या विशेष मोहिमेत रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिटशी संबंधित गोदामांचे पाच अन्न परवाने निलंबित करण्यात आले.
या मोहिमेत ८,३९२ किलो अन्नसाठ्यासह ४८.०९ लाख रुपयांचा माल आढळला. तीन आस्थापनांना परवाना नसताना व्यवसाय करत असल्याचे आढळल्याने त्यांचे कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुदतबाह्य, खराब, नाकारलेली आणि पॅकेजिंगचे नुकसान झालेली उत्पादने अधिकृत विल्हेवाटीसाठी पाठवल्यानंतर ती प्रत्यक्षात नष्ट न करता दलाल आणि विनापरवाना विक्रेत्यांच्या माध्यमातून बाजारात आणली जात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ ऑक्टोबरला ठाणे व पुणे जिल्ह्यांत सात पथकांनी एकाच वेळी तपासणी केली.
भिवंडीतील वाडपे येथे रिलायन्सच्या दोन गोदामांत, अंबरनाथच्या उसटणे येथे झोमॅटो हायपरप्युअरच्या गोदामात, तर पुणे जिल्ह्यातील चाकण आणि निघोजे येथे रिलायन्स रिटेल व ब्लिंकिटशी संबंधित गोदामांत त्रुटी आढळल्या.
विल्हेवाटीच्या कागदपत्रांत पाठवणारा आणि स्वीकारणारा एकच असल्याचे उल्लेख, मालाच्या प्रमाणात बॉक्स आणि किलो यांतील तफावत तसेच वाहतूक आणि विल्हेवाट एकाच दिवशी झाल्याची नोंद अशा विसंगती समोर आल्या.काही ठिकाणी अंतिम विल्हेवाटीचे पडताळणीयोग्य पुरावेही सादर करण्यात आले नाहीत.
या कारवाईत पाच परवाने १५ ऑक्टोबरला निलंबित करण्यात आले. भिवंडीतील डिस्काउंट स्टोअरमध्ये ८० हजार ५७५ रुपयांचे मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. संबंधित दुकानाकडे वैध अन्न परवाना नव्हता. त्याला माल पुरवणाऱ्या चाविंद्रा येथील आस्थापनाकडेही परवाना नसल्याचे आढळले. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भिवंडीतील बी. के. डिस्पोज या कथित विल्हेवाट केंद्रातही विविध कंपन्यांचा माल विनापरवाना साठविल्याचे आढळले. मालाची वाहतूक, हस्तांतरण आणि प्रत्यक्ष विल्हेवाट सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. या आस्थापनालाही कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परभणीत २२ टन फरसाण जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत परभणी एमआयडीसीतील मे. मोती नमकीन प्रा. लि. या फरसाण उत्पादक कारखान्यावर १६ ऑक्टोबरला छापा टाकण्यात आला. तेथे २२ हजार ५५० किलो मिक्स शेव व फरसाण, अंदाजे ६३.१४ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. कंपनीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये गुटखा-पानमसाल्याची वाहतूक रोखली
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची वाहतूक करणारी इनोव्हा कार पकडली. या कारवाईत ९.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि सात लाख रुपयांचे वाहन, असा १६.०७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकारांबाबत नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर अथवा अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
प्राथमिक तपासात कंपन्यांची गोदामे, विल्हेवाट कंत्राटदार, विनापरवाना साठवणूक केंद्रे आणि किरकोळ विक्रेते यांच्यातील पुरवठा साखळीची चौकशी सुरू आहे.
विल्हेवाट प्रमाणपत्रांमधील विसंगती आणि प्रत्यक्ष नाशाचे पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित कंपन्या, जबाबदार व्यक्ती, कंत्राटदार, दलाल आणि विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.