Mumbai Local Harassment Case : छेडछाडीला विरोध करताच लोकलमधून ढकलले; तरुणीने हात गमावला!

नायगाव रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना; ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखेला अटक
Mumbai Local Harassment Case
सोफिया खान pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमधून प्रवास करताना छेडछाडीला विरोध करून जाब विचारणाऱ्या २० वर्षीय विवाहित तरुणीला एका प्रवाशाने रेल्वे स्थानकावर लोकलमधून खाली ढकलून दिले. त्यात तरुणीचा डावा हात लोकलच्या चाकाखाली गेला. डोक्यालाही १६ टाके पडले. सुदैवानेच ती बचावली.

नायगाव रेल्वे स्थानकात ४ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेस कारणीभूत ठरलेला नराधम प्रवासी जितेंद्र हिरमुखे (५३) याला भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. जितेंद्रच्या छेडछाडीचा बळी ठरलेली सोफिया खान (२०) ही तरुणी बोरीवलीहून नायगावच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. या दरम्यान जितेंद्रने तिला अनेकदा नकोसा स्पर्श केला. वारंवार हटकूनही त्याने तिला हात लावणे सुरूच ठेवल्याने दोघांत वाद सुरू झाला.

Mumbai Local Harassment Case
Pune Biodiversity Garden: पुण्यातील ओसाड टेकडी बनली जैवविविधतेचे नंदनवन; २३ हजार वृक्षांचे संवर्धन

नायगाव स्थानकात लोकल आल्यानंतरही हा वाद सुरूच होता. तरुणीने आरोपीला जाब विचारत चप्पल फेकून मारली. आरोपीनेही तिच्यावर चप्पल फेकली. याच दरम्यान, आरोपीने तिला जोरात धक्का दिल्याने ती दोन डब्यांच्या मधील जागेतून रुळांवर पडली आणि त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला. तिचा डावा हात कोपरापासून निकामी झाला. डॉक्टरांना कोपराखालून तिचा हात कापून काढावा लागला. डोक्याला दुखापत झाल्याने १६ टाकेही घालण्यात आले. सध्या तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोफियाला लोकलमधून ढकलल्यानंतर पसार झालेला जितेंद्र पाच दिवस पोलिसांना सापडला नाही. मात्र, भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरातील तसेच अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा माग काढला. जितेंद्र हिरमुखे नायगाव पूर्व येथील वाकीपाडा परिसरातील रहिवासी आहे.

Mumbai Local Harassment Case
Nilwande Dam Water Release: रब्बी पिके आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा

एका हाताने कसे सावरायचे आयुष्य?

  • एक हात गमावून बसलेली सोफिया तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होय. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. आता एका हाताने आयुष्य कसे उभे करायचे, असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला आहे.

  • नराधम जितेंद्र हिरमुखेवर कठोर कारवाई करतानाच सोफियाला वैद्यकीय मदत, आर्थिक नुकसानभरपाई मिळणार का आणि मुख्य म्हणजे तिचे पुनर्वसन होणार का, असे प्रश्न निर्माण आहेत.

  • महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबे, रेल्वे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा असतानाही अशा घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.