

Mumbai Local Women Fighting :
मुंबई : विरार ते चर्चगेटदरम्यान लोकल ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा वाद इतका पेटला होता की त्यांनी एकेमेकींना रक्तबंबाळ केले होते. या घटनेतील पीडित महिला कविता मेंदाडकर यांनी हा वाद कशामुळे झाला होता? याबाबत घडलेला संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला. (Mumbai News)
मारहाण झालेली महिला कविता मेंदाडकर यांनी सांगितले की, त्या रोज मीरा रोड ते विरार असा प्रवास करतात. घटनेच्या दिवशी त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना गर्दीतून पुढे सरकता येत नव्हते. "मी ट्रेनमध्ये चढल्यावर तिथे असलेल्या एका महिलांच्या ग्रुपने मला पुढे जाण्यास सांगितले. मी त्यांना भाईंदरला उतरणाऱ्या प्रवाशांना उतरू द्या, मग मी पुढे जाते, असे समजावून सांगत होते," असे कविता यांनी सांगितले.
कविता यांनी पुढे सांगितलं की, "यानंतर त्या ग्रुपमधील एका महिलेने मराठी भाषेवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर मी तिला तुझ्या घरी नाही, ट्रेनमध्ये आहे. इथे कोणीही प्रवास करू शकते, असं सांगितलं. त्यावर तिने पुन्हा मला शिव्या दिल्या आणि केस पकडून डोक्यात मोबाईल मारला. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागले. बाकीच्या महिलांनी मला आत डब्यात घेतलं, नाहीतर मी पडले असते. त्यानंतर मी पण त्या महिलेचे केस पकडून मारहाण केली. भाईंदर स्टेशन आल्यावर त्या महिलांनी मला गाडीतून उतरवले, असे कविता यांनी सांगितलं. या घटनेनंतर दबावामुळे आणि भीतीपोटी पोलिसांत गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला डब्यात किरकोळ वादातून घडलेली ही तुंबळ हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद झाली होती. एकमेकींचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाच्या या घटनेबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रेल्वे पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
महिला डब्यात गर्दी ही नित्याची बाब आहे. सकाळी आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या महिलांमुळे लोकल ट्रेनमध्ये जा-गेवरून किंवा गर्दीतील ढकला ढकलीवरून अनेकदा वाद निर्माण होतात. पण या वादांना इतक्या टोकाला नेणे आणि थेट मारहाण करणे हे नक्कीच चिंताजनक आहे. यामुळे इतर प्रवासी महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते.
रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. तसेच महिला डब्यात सुरक्षा वाढवण्याची गरजही असल्याची मागणीही होत आहे.