

मुंबई : घाटकोपर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिला पायलटचा धावत्या कॅबमध्ये शनिवारी (दि.२२) रात्री विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी कॅब चालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी असलेल्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पायलट रात्रीच्या वेळी मुंबईतील काळा घोडा परिसरातून घरी जाण्यासाठी एका कॅबमध्ये बसली होती. मात्र, कॅब चालकाने ठरलेल्या मार्गाने न जाता गाडी एका वेगळ्याच ठिकाणी नेली. तिथे त्याने गाडीत आणखी दोन अनोळखी व्यक्तींना बसवले.
गाडी पुन्हा सुरू झाल्यावर, त्या दोन व्यक्तींपैकी एकाने पीडित महिलेचा हात पकडून पिळला, तर दुसऱ्याने तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार सुरू असतानाच पुढे पोलिसांची नाकाबंदी दिसल्याने दोन्ही आरोपी गाडीतून उतरून पळून गेले. त्यानंतर कॅब चालकाने महिलेला तिच्या घरी सोडले.
घरी पोहोचल्यानंतर पीडित महिलेने कॅब चालकाला त्या दोन व्यक्तींबद्दल जाब विचारला असता, त्याने कोणतेही उत्तर न देता तिथून निघून गेला. घडलेल्या प्रकाराने हादरलेल्या महिलेने संपूर्ण हकीकत आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कॅब चालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. तर, त्याच्या इतर दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.