

मुंबई/ बदलापूर : मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा बुधवारी ऐन सकाळी विस्कळीत झाली आणि बदलापूरहून कर्जत दिशेला जाणार्या लोकल चार तास रखडल्या होत्या. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्या ऑटोमॅटिक थांबल्यामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणार्या लोकल खोळंबल्या. कर्जतहून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे त्याचा परिणाम अप दिशेकडील वाहतुकीवरही झाला.
अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हवालदिल झाले.मंगळवारीही सकाळी साडेसहाच्या सुमारास अग्निरोधक यंत्रणा अचानक कार्यान्वित झाल्यामुळे मेल-एक्स्प्रेस तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबून राहिल्या होत्या. हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तासभराचा वेळ लागला. बुधवारी दुसर्याच दिवशी पुन्हा मुंबई-कर्जत लोकलचा खोळंबा झाला.
विशेषत: कल्याण ते कर्जत या मार्गावरील प्रवास करणार्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. पुणे आणि दक्षिणेकडे जाणार्या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या ही उशिराने धावत होत्या. अग्निरोधक यंत्रणा अचानक कशा सक्रिय झाल्या, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबईहून कर्जतच्या दिशेने आणि कर्जत रेल्वे स्थानकातून अपमार्गावर प्रवास करणार्या लोकल सेवांप्रमाणे आणि कर्जत डाऊन मार्गावरून नियमित प्रवास करणार्या मेल एक्स्प्रेस रेल्वेही तब्ब्ल 2 ते 3 तास एकाच जागेवर थांबवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जतसह बदलापूरच्या पुढच्या रेल्वे स्थानकावरील बहुतांश प्रवाशांनी इतर पर्यायी मार्ग निवडून प्रवास केला.
तब्बल 3 ते 4 तास लोकल विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कर्जतकडे रवाना होणार्या दिवसभरातल्या लोकल रेल्वे सेवांना बुधवारी स्थगिती देण्यात आली. त्याचप्रमाणे दर दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, परळ, आणि ठाण्याहून कर्जत डाऊन मार्गावरील लोकलच्या ऐवजी बदलापूर धीम्या लोकल रवाना करण्यात आल्या.