

ठाणे : मुंबईहून नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या मागणीला अखेरीस मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नाशिकहून मुंबईत नियमित अप, डाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देत मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा प्रवास करणाऱ्या लोकल सेवांमध्ये वाढ करत कसारा रेल्वे स्थानकातून नाशिक शहराकरिता मेमू लोकल सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेतले आहे. तसेच डाऊन कसारा रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळामधील बिघाड दुरुस्तीचे नियोजन करून कसारा रेल्वे स्थानक ते नाशिक रेल्वे स्थानकादरम्यान मेमू लोकल सेवा येत्या नवीन वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने माध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिक रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकांमधून दर दिवशी भरपूर नोकरदार वर्ग, आणि चाकरमानी प्रवास करत असतात. दरम्यान या अगोदर बहुतांश प्रवाशांना या डाऊनमार्गावरून अप मार्गावर प्रवासादरम्यान भरपूर हाल व्हायचे. या अनुशंगाने काही स्थानिक प्रवाशी संघटनेने आणि इतर प्रवाशांनी लोकल रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु काही कारणास्तव प्रवाशांची मागणी दुर्लक्षित झाली होती. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे नाशिक डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा वाढीच्या आणि कसाऱ्यावरून नाशिक शहराला जाण्यासाठी मेमू लोकल सेवेची पूर्तता करावी या मागणीला केंद्र रेल्वे प्रशासनाच्या समोर उपस्थित केले.
केंद्र रेल्वे प्रशासनाने स्थगित असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि कसारा रेल्वे स्थानकातून नाशिक रेल्वे स्थानकासाठी मेमू लोकल सेवेच्या मागणी होकार देत तातडीने रेल्वेचे काम पूर्ण करून तात्काळ नाशिककरांच्या सेवेसाठी रुजू व्हावी असे जाहीर केले.
९०% रेल्वेचे तांत्रिक काम पूर्णत्वास
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कसारा डाऊन मार्गावरील आणि कसाऱ्याहून नाशिक जाणाऱ्या डाऊन मार्गावरील रेल्वे सेवांचे काम तब्बल ९०% झाल्याचे जाहीर केले आहे. येत्या नवीन वर्षात उर्वरित काम होऊन कसारा रेल्वे स्थानकातून नाशिककडे प्रवास करणाऱ्या मेमू लोकल रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नियुक्त होतील अशी शक्यता मध्य रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने नाशिकसह पुणे आणि इतर जिल्ह्यांच्या जोडणीनिमित्त रेल्वे प्रकल्प चालू केल्याचे माध्यमांशी बोलताना जाहीर केले आहे. त्याच प्रमाणे पुढील मध्य रेल्वे मार्गावरील इतर रेल्वे प्रकल्पांचे काम येत्या नवीन वर्षात सुरू करण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.