

मुंबई : मुंबई शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता बांबूची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी उद्यान विभागाला रस्त्यालगत व अन्य ठिकाणी जमीन शोधण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील वर्षापासून बांबूची लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. याबाबत सोमवारी पत्रकारांशी बोलताना ढाकणे यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी येणार्या काळात प्रयत्न राहणार आहेत. मुंबईत वाढत्या वाहनांसह इमारतीच्या बांधकामांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. हे रोखण्यासाठी नियमावली तयार केली आहे. याचे 100 टक्के पालन होते की नाही, हे यापुढे बघितले जाणार आहे. एखाद्याने नियमाचे पालन न केल्यास त्याला सुरुवातीला दहा हजारपर्यंत दंड करण्यात येईल. मात्र तरीही त्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर दामदुप्पट दंड आकारण्यासाठी प्रस्ताव बनवण्याचे निर्देश पत्रकार परिषदेमध्ये ढाकणे यांनी पर्यावरण विभागाला दिले.
मुंबई पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यापुढे बांबू लागवडीवर महापालिकेचा भर राहणार आहे. बांबूची लागवड कुठेही करता येऊ शकते. विशेष म्हणजे बांबू अन्य झाडांप्रमाणे वार्यामुळे पडत नाही. त्यामुळे बांबू लागवड अधिक फायदेशीर असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. बांबू लागवडीसाठी जमीन शोधण्यासह प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उद्यान विभागाला देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासह ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गालगत नैसर्गिक ग्रीन नेट म्हणजेच पाच लाख बांबू लावण्याचा संकल्प केला होता. पण ही योजना कागदावरच राहिली.
आता मुंबईचे प्रदूषण विक्रमी पातळीवर पोहोचले असताना ही बांबू लागवड कधी सुरू होणार आणि त्याचे फायदे मुंबईकरांना कधी मिळणार याचा अंदाज तूर्तास महापालिकेलाही नाही.